नवी मुंबई : ऐतिहासिक पार्श्वभूमीची साक्ष देणाऱ्या पुरातन तोफांची पनवेलमध्ये उपेक्षा अद्याप थांबलेली नाही. बंदर रोड परिसरात वर्षानुवर्षे पडलेल्या तोफा ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बसविण्यात आल्या. परंतु त्याचा वापर बसण्यासाठी केला जात असल्याने इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पनवेल शहरास ३०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. समुद्रमार्गे मोठा व्यवसाय येथील बंदरावर चालत होता. मोगल, इंग्रज, पोर्तुगाल व मराठ्यांच्या छावण्या या ठिकाणी होत्या. चिमाजी आप्पासारखे लढवय्ये सरदार येथे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी बंदराच्या रक्षणासाठी त्या परिसरात तोफा बसविल्या होत्या. शहराचा विस्तार वाढत गेल्याने या तोफांकडेही दुर्लक्ष होऊ लागले. येथील जमीन एका संस्थेने घेतल्यानंतर या तोफा जमिनीत गाढण्यात आल्या. इतिहासप्रेमींनी आवाज उठविल्यानंतर त्या जमिनीतून काढून त्या परिसरात फेकून दिल्या होत्या. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिकेने त्या मुख्यालयाच्या परिसरात आणून ठेवल्या. जवळपास वर्षभर या तोफा एका कोपऱ्यात पडल्या होत्या. पुन्हा याविषयी ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर नगरपालिकेने मुख्यालयासमोर त्या बसविल्या आहेत. ऐतिहासिक तोफांनी नगरपालिकेच्या वैभवात भर पडली आहे. परंतु या ऐतिहासिक ठेव्याचा अवमान सुरूच आहे. नगरपालिकेमध्ये कामानिमित्त येणारे नागरिक बैठक व्यवस्थेप्रमाणे या तोफांचा वापर करीत आहेत. दिवसभर अनेक जण तोफांवर बसून गप्पांची मैफील रंगवत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या या तोफा म्हणजे कार्यालयासमोरील बसण्याचे बेंच नाहीत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली जात असून नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे.
पुरातन तोफांचा वापर बैठकीसाठी
By admin | Updated: March 17, 2016 02:30 IST