कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्र मण करून बांधकामे होत असतात. असेच एक बांधकाम नेरळ ग्रामपंचायतीच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या जागेवर झाले आहे. या जागेवर मोठी इमारत उभी राहिली असून हे अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने सहा महिन्यांपूर्वी थांबविले होते. मात्र सुटी बघून या जागेवर बांधकामे सुरूच असल्याने अखेर नेरळ ग्रामपंचायतीने सर्व इमारत तोडण्याची नोटीस बजावली आहे.ग्रामपंचायतीचे निवृत्त सफाई कर्मचारी हरिश्चंद्र जाधव यांचे नेरळ सम्राटनगर भागात राहते घर होते. ते आपल्या बहिणीकडे रहायला गेल्यानंतर त्याचा गैरफायदा घेवून ही जमीन शेजारी असलेल्या व्यक्तीने एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. नेरळ ग्रामपंचायतीच्या दफ्तरी आजही त्यातील २०० चौरस फूट जमीन हरिश्चंद्र जाधव यांचे नावे आहे. मात्र जमिनीची विक्र ी होऊन तेथे इमारत बांधण्याचे काम सुरु होताच हरिश्चंद्र जाधव यांनी नेरळ ग्रामपंचायत गाठून आपल्या जमिनीची कागदपत्रे सादर करीत अतिक्र मण झाले असल्याची तक्रार केली. त्यानंतर विद्यमान सरपंच राजश्री कोकाटे यांनी आपल्या निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या हरिश्चंद्र जाधव यांच्या पडीक घराचा विषय मासिक सभेत उपस्थित केला. त्यावेळी सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या निवृत्त कर्मचारी असलेल्या जाधव यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आता तर त्या जागेवर कार्यालय थाटले असून कोणतीही परवानगी न घेता तेथे वीज पुरवठा घेतला आहे. महावितरण कंपनीने कोणत्या आधारावर त्या अनधिकृत ठरविलेल्या बांधकामास वीज जोडणी दिली आहे, याची चौकशी नेरळ ग्रामपंचायतीने सुरु केली आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने २३ आॅक्टोबरला संबंधित बिल्डरला नोटीस पाठवून ग्रामपंचायतीच्या ठरावाचा आणि अटी शर्थीचा भंग केल्याची नोटीस बजावली. मात्र बिल्डरने याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या नेरळ ग्रामपंचायतीने हे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरपंच राजश्री राजेश कोकाटे आणि उपसरपंच केतन पोतदार यांनी हे अतिक्र मण पाहण्यासाठी त्या भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत नेरळ ग्रामपंचायतीचे अतिक्र मण विरोधी पथक होते. सरपंच कोकाटे यांनी अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश यावेळी दिले. (वार्ताहर)
नेरळमध्ये अनधिकृत बांधकाम
By admin | Updated: October 28, 2015 23:25 IST