दरवर्षी मुसळधार पावसामुळे गाढी नदीला महापूर येतो. सोमवारी जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने सुमारे ५०० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गावात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. गावातील रिक्षाचालकांना रिक्षा घेऊन बाहेर जाता आले नाही. पुलावरून पाणी गेल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, रिक्षाचालक यांना त्रास सहन करावा लागला.उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात गावात जाण्याचा मार्ग बंद राहत होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होती. नाबार्डकडून उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरोली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गाढी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला आहे. उमरोली येथील नागरिकांसाठी नवीन पूल उभारण्यात येईल, असे गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र यंदा जुन्या व छोट्या पुलावरून पाणी गेल्यामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पनवेल तालुक्यातील उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी उमरोली गावाचा संपर्क तुटतो. याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून उमरोली ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या आहेत. स्वातंत्र्य काळापासून उमरोलीवासीयांना पुलाचा प्रश्न सतावत आहे. २०१९ मध्ये १ कोटी ४६ लाख रुपयांच्या नवीन पुलाचे काम मंजूर करण्यात आले. त्यामुळे उमरोली येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यंदा पूल बांधून तयार होईल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र जवळपास ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या पुलाचे काम अपूर्णच आहे. पावसामुळे पुलासाठी लावलेले लोखंडी पाया देखील वाहून गेला आहे. दरम्यान संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
तुर्भेत चार घरे वाहून गेलीतुर्भे एमआयडीसी परिसरात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे चार घरे वाहून गेली. तिथल्या ओमकार कॉरीलगतच्या परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये मदन पवार, इंदर दळवी, मदन दळवी व दशरथ काटे यांचा समावेश आहे. पाण्याच्या प्रवाहात त्यांचे घर वाहून गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहेत, तर अजय डांगे व अशोक मांझी यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.रानसई धरण ओव्हरफ्लोउरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात कोसळणारे पावसाचे पाणी आणि डोंगर माथ्यावरून वाहणारे पाणी थेट रानसई धरणात येवून मिसळत असल्याने सोमवारी दुपारपासून धरण दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती एमआयडीसी उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.