नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर शुक्र वारी सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगाने नेरळहून शेलूकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.नेरळ खांडा येथील रहिवासी असलेले नीलेश बुधाजी मरे हे आपली रिक्षा (एमएच 0६- एसी -२१२६) घेऊन शेलू येथून नेरळकडे येत होते. रिक्षा दामत गावाजवळ आली असता नेरळकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच ४६,पी 0६५५) भरधाव वेगाने येत राज्यमार्गावरील दुभाजक तोडून रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील चार प्रवाशांपैकी दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. धनपत्ती रामरतन यादव (७५) व गुलाब गणपत तुपे (५०) अशी त्या महिलांची नावे आहेत. कार शेलूजवळील बांधिवली गावातील पोलीस पाटील श्रीराम निमणे पाटील यांचा मुलगा दीपक चालवीत होता. स्थानिकांनी जखमी रिक्षाचालक नीलेश बुधाजी मरे, भीमराव आणि रामरतन यादव यांना नेरळ येथील खासगी रु ग्णालयात दाखल केले. यादव या शेलू येथील तर तुपे या नेरळजवळील देवपाडा येथील रहिवासी आहेत. कार चालक दीपक निमणे किरकोळ जखमी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघातात जखमी झालेला रिक्षा चालक नीलेश मरे याच्या चेहरा व कंबरेला जबर मार लागला आहे. त्याच्यावर बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य जखमी भीमराव आणि रामरतन निरंजन यादव या दोघांवर नवी मुंबई येथील एमजीएम रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. (वार्ताहर)
राज्यमार्गावर अपघातात दोन ठार
By admin | Updated: July 16, 2016 02:04 IST