नवी मुंबई : तुर्भे डम्पिंग ग्राऊंडमधील घनकचऱ्यावर प्रक्रिया केंद्रालगत आगीची घटना मंगळवारी पहाटे घडली. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची चार महिन्यातली दुसरी घटना असून समाजकंटकांकडून आग लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास तुर्भे येथील महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग लागल्याची घटना घडली. शास्त्रोक्त पध्दतीने निर्माण केलेल्या घनकचऱ्याच्या सेलवर एका भागात हा प्रकार घडला. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी उपस्थित राहून आग पसरण्यापूर्वीच नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरून रहिवाशांना त्रास होण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती. चार महिन्यापूर्वी देखील त्याठिकाणी आग लागली होती. शहरातला घनकचरा मोठ्या प्रमाणात साठवल्या जात असलेल्या या डम्पिंगच्या ठिकाणी पालिकेच्या वतीने पुरेपूर खबरदारी घेतली जाते. त्यानंतरही आगीच्या घटना घडत असल्याने यामागे समाजकंटकांचा हात असल्याची शक्यता आहे. रहिवाशांमध्ये भीती निर्माण करून प्रशासनाविरोधात संताप निर्माण करण्याचाही त्यामागचा उद्देश असण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या वतीने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
तुर्भे डम्पिंगला आग
By admin | Updated: March 2, 2016 02:20 IST