नवी मुंबई : ठेकेदाराला कार्यादेश देऊनही भूमिपूजनासाठी झालेल्या दिरंगाईमुळे पनवेलमधील काँक्रीटीकरणाचे काम रखडले आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यामध्ये शहरात चक्का जाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता असून, पालिका प्रशासनाने तत्काळ योग्य उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगे्रसने केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक शिवदास कांबळे यांनी नगराध्यक्षा चारुशीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना पत्र पाठवून काँक्रीटीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. पनवेल शहरामध्ये प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. रोडवरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरातील प्रमुख पाच रोडचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएच्या सहकार्याने हे काम केले जाणार असून, त्यासाठी ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. खड्ड्यांची समस्या किमान काही वर्षे सुटणार असल्याने शहरवासीयांनीही या निर्णयाचे स्वागतच केले होते. काँक्रीटीकरणासाठी निविदा प्रक्रिया आॅक्टोबर २०१५ मध्येच पार पाडली होती. ठेकेदाराला कार्यादेशही दिले होते, परंतु उद्घाटनासाठी राज्यातील नेत्यांची वेळ मिळत नसल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ८ जानेवारीला भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. ३० मेनंतर शहरातील खोदकाम व इतर कामे थांबवावी लागणार आहेत. अर्धवट राहिलेल्या कामांमुळे महत्त्वाच्या रोडवर प्रचंड वाहतूककोंडी होणार आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय व अपघात होण्याचीही शक्यता आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने महापौर व मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन अर्धवट राहिलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शहरवासीयांना प्रत्येक वर्षी रोडवरील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. आता प्रमुख रस्तेच खोदून ठेवले आहेत. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठोस उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यात वाहतूककोंडी होणार !
By admin | Updated: May 15, 2016 04:08 IST