ठाणे : ठाणे जिल्ह्यात इतर शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, जिल्ह्यातील ३ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे नमुने तपासणाऱ्या राज्य प्रयोगशाळेने तसा अहवाल जिल्हाधिकारी आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवला असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. राज्य प्रयोगशाळेमध्ये राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या पाण्याची अणुजैविक तसेच रासायनिक पद्धतीने तपासणी केली जात असते. त्यासाठी पालिका हद्दीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने मागवण्यात येत असतात. त्यानुसार मे महिन्यात ठाणे, उल्हासनगर, वसई-विरारसह राज्यभरातील अनेक मनपा आणि नगरपालिकांकडून पाण्याचे नमुने मागवून त्यांची तपासणी केली होती. यापैकी ठाणे आणि नवी मुंबई पालिकांच्या स्वत:च्या प्रयोगशाळा आहेत. तरीही, राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करणे बंधनकारक असल्यामुळे ही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ठाणे, उल्हासनगर तसेच वसई-विरार महापालिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी १० टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दूषित पाण्यामुळे शहरात पटकी, कॉलरा, मलेरिया, कावीळ अशा आजारांमध्ये भरच पडत असल्याचे दिसत आहे. पाणी प्रदूषण कायद्यान्वये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असा दंडक आहे. हा नियम पालिका पाळतात की नाही, हे तपासण्यासाठी राज्य आरोग्य शाळेकडून ठरावीक कालावधीमध्ये पाण्याची तपासणी होत असते. त्याचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी आणि पालिकांच्या प्रशासनाला पाठवण्यात येत असतो. ठाणे, वसई-विरार तसेच उल्हासनगर पालिकांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा अहवाल या प्रयोगशाळेने मे महिन्याच्या अखेरीस पाठवला. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. (प्रतिनिधी)
तीन मनपांत दूषित पाणी
By admin | Updated: July 4, 2014 03:42 IST