नवी मुंबई : कुकशेत येथील मारहाणप्रकरणी फरार असलेल्यांपैकी तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरावर झालेल्या कारवाईवरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती.कुकशेत येथील युवासेनेचा पदाधिकारी मकरंद म्हात्रे याला जबर मारहाण झाली होती. त्याच परिसरातील काही तरुणांनी लोखंडी रॉडसह इतर हत्याराने जबर मारहाण केली होती. यामध्ये मकरंद याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी त्याला ठार मारण्याच्या उद्देशानेच त्याच्यावर हल्ला केला होता. सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. या हल्याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सूरज पाटील व सहकारी विशाल पाटील या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असताना इतर तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये अटक नगरसेवकाच्या भावाचादेखील समावेश आहे. संदीप पाटील (२७), विनायक धोत्रे (३०) व सलमान दोरा अशी त्यांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी दाखल झालेल्या तक्रारीत संदीपच्या नावाचा समावेश आहे. मात्र धोत्रे व दोरा या दोघांची नावे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली. मकरंदला मारहाण करणाऱ्यांमध्ये यांचाही समावेश होता. यानुसार शोध घेऊन त्यांना अटक केल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुकशेत प्रकरणात आणखी तिघांना अटक
By admin | Updated: November 2, 2015 01:53 IST