नवी मुंबई : सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईचा विकास आराखडा बनविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. सिडकोच्या जुन्या आराखड्याच्या आधारावर नियोजन करावे लागत आहे. नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. महानगरपालिकेची स्थापना होवून २३ वर्षे झाली. या कालावधीमध्ये पालिकेने अनेक क्षेत्रांतील पुरस्कार मिळविले. आर्थिकदृृष्ट्या सक्षम महापालिकांमध्येही नवी मुंबईचा समावेश होतो, मात्र महापालिकेचा विकास आराखडा अद्याप तयार करता आलेला नाही. या शहरात उद्यान, मैदान, रुग्णालय, शाळा व इतर आरक्षण कुठे असावे, रस्त्यांचे नियोजन निश्चित झालेले नाही. सिडकोे ज्या ठिकाणी मैदानासाठी भूखंड देते तेथे मैदान तयार करावे लागत आहे. सिडकोने शहरात अनेक ठिकाणी सामाजिक सेवेसाठी भूखंड ठेवलेले आहेत. परंतु आता जागेची किंमत प्रचंड वाढली असून सिडको गरजेप्रमाणे भूखंडांचे आरक्षण बदलत आहे. सीवूड्समध्ये पत्रकार भवनाच्या कामाचे भूमिपूजन केले. परंतु नंतर तो रद्द करण्यात आला. अशाचप्रकारे इतर ठिकाणीही होत आहे. पालिका सिडकोच्या जुन्या आराखड्याच्या आधारावर काम करत आहे. विकास आराखड्याच्या प्रस्तावाचे आज सर्वसाधारण सभेमध्ये पडसाद उमटले. शिवसेनेच्या किशोर पाटकर यांनी आराखडा मंजूर नसल्यामुळे होणारे नुकसान सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. स्वत:चा विकास आराखडा नसल्यामुळे विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरात निवासी बांधकाम किती असावेत, वाणिज्य बांधकाम किती टक्के असावे याचे निकष ठरले आहेत. नेरूळमध्ये निकषापेक्षा जास्त वाणिज्य बांधकाम झाले आहे. महापालिका स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. परंतु अद्याप आपला आराखडा तयार नाही ही खेदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. इतर नगरसेवकांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली.
विकास आराखडाच नाही
By admin | Updated: July 11, 2015 03:46 IST