नवी मुंबई : शहरातील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात यावीत, सात दिवसांमध्ये सर्व पदपथ फेरीवालामुक्त झाले पाहिजेत, यापुढे एकही नवीन झोपडी उभी राहिली किंवा पूर्वीच्या अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास विभाग अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रशासनातील बेशिस्त मोडून काढल्यानंतर आता त्यांच्याकडून शहरहिताची कामे करून घेण्यास प्राधान्य दिले आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर सौराष्ट्र पटेल हॉलच्या दिशेला जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. कोपरखैरणे सेक्टर १५ व १७ च्या मधील पूर्ण रोड सायंकाळी फेरीवाल्यांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवला जात आहे. प्रत्येक नोडमध्ये महत्त्वाचे रस्ते, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी पदपथ व इतर मोक्याच्या जागा फेरीवाल्यांनी अडविल्या आहेत. आयुक्तांनी सोमवारी अतिक्रमण विभागाची विशेष बैठक बोलावली. या बैठकीमध्ये अतिक्रमणविषयक कामकाज प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सात दिवसांमध्ये काय काम करायचे याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. फेरीवाले, अनधिकृत बांधकाम, फिरत्या वाहनांद्वारे विक्री व्यवसाय करणारे व्यावसायिक किंवा कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण शहरात दिसता कामा नये. यापुढे नवी मुंबईमध्ये कोणत्याही स्वरूपाचे नवीन अनधिकृत बांधकाम अथवा झोपडीचे बांधकाम होणार नाही याविषयी दक्षता घेण्यात यावी. कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले कार्यासन अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. सहा गठ्ठा पद्धतीनुसार कामाचे वर्गीकरण करून प्रशासन गतिमान राहील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत. सर्व विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढील सात दिवसांमध्ये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. जर कोणी अतिक्रमणांना पाठीशी घातले तर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५६ अन्वये विभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात दिवसांमध्ये पदपथ व रोडवरील फेरीवाले हटविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याशिवाय शहरात कुठेही अनधिकृत बांधकाम होणार नाही. एकही नवीन झोपडीचे बांधकाम होता कामा नये अशा सूचना दिल्या आहेत. अतिक्रमणास अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे पुढील सात दिवसांमध्ये शहर फेरीवालामुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोपरखैरणेत कारवाईचा दिखावाकोपरखैरणे सेक्टर १५ ते १७ मधील रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रविवारी पुर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. नागरिकांनी तक्रारी करूनही विभाग अधिकारी ठोस कारवाई करत नाहीत. परंतू सोमवारी आयुक्त भेट देणार असल्यामुळे अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई केली. परंतू एक तासामध्ये पुन्हा फेरीवाल्यांनी त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यास सुरवात केली. यामुळे फक्त आयुक्तांना दाखविण्यासाठी कारवाईचे नाटक केले जात असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
...तर अधिकाऱ्यांवर गुन्हे
By admin | Updated: May 25, 2016 04:31 IST