ठाणे : संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्याला तत्काळ पोलीस मदत मिळावी, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलेले अॅप्लिकेशन ‘होप’ आता एक हजारी झाले आहे. मात्र, प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन असतांनाही व सहजपणे तसेच मोफत डाऊनलोड होणाऱ्या या अॅप्लिकेशनपासून नागरिक फटकून राहत आहेत. नागरिकांनी इतर अॅप्लिकेशन्स सोबत ‘होप’ही डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलीस मदत मिळवण्यासाठी यापूर्वी १०० नंबर डायल करावा लागत होता. मात्र, आधुनिकतेची कास धरून २०१५ च्या जून महिन्यात शहर पोलिसांनी नागरिकांसाठी हे अॅप्स सुरू केले. या सुविधेशिवाय सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयोगी अशा विविध अत्यावश्यक सेवा त्याद्वारे दिल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी हेल्पलाइन, अॅण्टीरॅगिंग हेल्पलाइन, अॅम्ब्युलन्स सेवा, अपघात मदत, लहान मुलांसाठी हेल्पलाइन, अग्निशमन सेवा इत्यादी तातडीच्या सेवांचा समावेश आहे. तसेच महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती, सायबर क्राइम इत्यादींसंदर्भात कशी काळजी घ्यावी, याबाबत सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम, दंडाची रक्कम, विविध परवाने काढण्यासाठी लागणारा कालावधी, चोरीस गेलेल्या वाहनाचा तपशील, हरवलेल्या व्यक्तींची माहिती, पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती इत्यादी बाबींचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. तरीसुद्धा, जूनपासून सप्टेंबरपर्यंत फक्त एक हजार नागरिकांनीच हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
‘होप’कडे ठाणेकरांची पाठ
By admin | Updated: October 1, 2015 23:28 IST