नवी मुंबई : साध्या कारला विदेशी कारचा आकार देवून वापरात असलेल्या दोन वाहनांवर आरटीओने कारवाई केली आहे. वाशी व अंधेरी परिसरातून या कार जप्त करण्यात आल्या आहेत. लग्न व पार्टी सोहळ्यासाठी त्या भाड्याने दिल्या जायच्या. लग्न सोहळ्यासह पार्टीसाठी विदेशी लक्झरी कारचा वापर हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यानुसार लिमो, हमर व इतर अनेक विदेशी बनावटीच्या कारची भारतात मागणी वाढत आहे. याचाच आधार घेत साध्या कारला विदेशी लक्झरी कारचा आकार देवून व्यावसायिक वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा दोन बनावट विदेशी कार नवी मुंबई आरटीओने जप्त केल्या आहेत. मूळ स्कॉर्पिओ कारच्या रचनेत व लांबीत बदल करून विदेशी लिमो कार बनवण्यात आली आहे. त्याशिवाय लक्झरी कारमध्ये असणाऱ्या सुविधाही त्यामध्ये पुरवण्यात आलेल्या आहेत. या कारचे मूळ मालक गुजरातचे असून ट्रॅव्हल एजन्सीमार्फत त्या लग्न व पार्टी सोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जायच्या. यासाठी तासाला १० ते २० हजार रुपये भाडे आकारले जायचे. याची माहिती नवी मुंबई आरटीओचे निरीक्षक आनंदराव वागळे व नीलेश धोटे यांना मिळाली होती. यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला होता. सदर कार (जीजे ७ बीबी ७६६६) गुजरात येथून वाशीत आली असता ती ताब्यात घेतली. तर कारचालकाकडे केलेल्या चौकशीत अशीच दुसरी कार (जीजे ७ बीबी ८६६६) अंधेरी येथे असल्याचे समजताच त्याठिकाणी जावून ती देखील ताब्यात घेतली. दोन्ही कारची कागदपत्रे तपासली असता त्या मूळ स्कॉर्पिओ कार असून विनापरवाना त्यामध्ये बदल केल्याचे समोर आले. दोन्ही कार जप्त केल्याचे अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. या कार नझीम वाहोरा व गुलामनबी बोरा यांच्या मालकीच्या असून दोघेही मूळचे गुजरातचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे बनावट विदेशी कारचा व्यावसायिक वापर करत आहेत. यानुसार दोन्ही कारचे परवाने रद्द केले जाणार असून मालकांनाही नोटीस बजावल्याचे धायगुडे यांनी सांगितले. शिवाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी देखील कायद्याची बाब पडताळली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. वाहनाच्या मूळ आराखड्यात बदल केल्यास संबंधित टेस्टिंग एजन्सी व आरटीओची परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्यांनी ती घेतलेली नव्हती. कारची लांबी वाढल्याने ती मध्यभागी तुटून अथवा वळणावर अपघाताची शक्यता होती. शिवाय मागच्या व पुढच्या चाकामधले अंतर वाढल्याने ब्रेकच्या प्रभावावरही परिणामाची शक्यता असल्याने आरटीओने दोन्ही वाहनांवर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिकासदर बनावट लक्झरी कार मुंबईसह देशभर रस्त्याने फिरत असताना एकाही वाहतूक पोलिसाने ती अडवून चौकशी केली नाही. तसे झाले असते तर यापूर्वीच कारचा पोल खोल झाला असता. पाहताक्षणी कारवर संशय येत असतानाही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, अथवा श्रीमंताची कार अडवण्याचे धाडस त्यांना झाले नसावे याचीही शक्यता आहे. त्यामुळे जप्त केलेली कार मुंबईतून नवी मुंबईत आणताना देखील वाहतूक पोलिसांनी अडवून चौकशी केली नाही. १मूळ स्कॉर्पिओच्या लांबीमध्ये वाढ करून २१ फूट लांबीची ही लक्झरी कार बनवण्यात आलेली आहे. यामुळे १,८८० किलो वजनाची ही कार २,६३० किलोची झाली होती, तर उंचीतही थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. तर कारमध्ये आलिशान बैठकीची सोय, रंगीबेरंगी विद्युत रोशणाई व मद्यपानाची देखील सोय केलेली आहे. २यानुसार संपूर्ण भारतात समारंभासाठी ही कार भाड्याने फिरत होती. मात्र कारसाठी तासाला १० ते २० हजार रुपये आकारले जात असताना चालकाला मात्र दिवसाला ५०० रुपये वेतन दिले जायचे, तर संबंधितांकडून वेळोवेळी कारचालक बदली करून त्याची गोपनीयता राखली जात होती.
बनावट विदेशी कार जप्त
By admin | Updated: December 19, 2015 02:48 IST