अलिबाग : अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोरही गळून गेल्याने बागायतदार चांगलेच हवालदिल झाले आहेत. वीटभट्ट्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने वीटभट्टी मालक मेटाकुटीला आले आहेत. अवकाळी पावसाने सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि काही अवधीतच तुफान पावसाला सुरुवात झाली.पावसामुळे शेतामध्ये सध्या पालेभाज्या, तोंडली, कारली, पांढरा कांदा, चवळी, मुगाचे पीक जोरात आहे. परंतु पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या प्रतिवर फरक पडणार असल्याने बाजारात अपेक्षेप्रमाणे किंमत आता मिळणार नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे कावीर येथील शेतकरी हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. रायगड बाजार परिसरात झाड पडल्याने काहीकाळ विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. (प्रतिनिधी)माथेरान : सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहू लागला. दुपारी १२ वाजता रिमझिम पावसाने सुरु वात केल्याने हवेतील उष्मा काहीशा प्रमाणात कमी झाला, परंतु वाऱ्याने येथील कापडिया मार्केटजवळील गणेश कदम यांच्या घराजवळ असलेल्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या घरालगत पडली. सुदैवाने यामध्ये काही हानी झाली नसली तरी हे झाड अतिवृष्टीत केव्हाही कोसळून वित्तहानी अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंजिरा : अवकाळी पावसाने शुक्रवारी सर्वत्र गोंधळ उडाला. जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे बागायतींची मोठी हानी झाली. शहरातील दरबार रोडवर एका घराच्या गच्चीवर उंच नारळाचे झाड कोसळले. संपूर्ण कठडा तोडून झाड टेरेसवर कोसळले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्रभर सोसाट्याचा वारा सुरू होता. अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलवली आणि उसर येथील पाच घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. जगदीश ठाकूर, प्रमोद मयेकर, सिताराम घरत, सुरेश घरत सर्व रा. खानाव-वेलवली रमाकांत शिंदे (रा. उसर ) यांच्या घरांचे छप्पर उडून प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती खानावचे सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी दिली. १कार्लेखिंड : अवकाळी पावसाने शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेला वारा आणि पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो शेतकरी बांधवांना. कार्लेखिंड विभागात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. यामुळे आंबा फळाची गळती होऊ शकते, बागायतदार चिंतेत आहेत.
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Updated: March 5, 2016 02:11 IST