नवी मुंबई : प्रलंबित साडेबारा टक्के भूखंड वाटपाच्या मरगळलेल्या प्रक्रियेला सिडकोने आता गती दिली आहे. त्यानुसार नवीन वर्षात भूखंडांची मेगा सोडत काढण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोने पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील २४५ संचिकांची पात्रता यादी जाहीर केली आहे. या पात्रतेविषयी काही वाद किंवा तक्रारी असल्यास त्यासंदर्भात पुराव्यांसह संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी साडेबारा टक्के भूखंड योजनेची शिल्लक प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रकरणांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेेंद्र चौहान यांनी या कामाला गती दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील उलवे, करंजाडे, कळंबोली, आसुडगाव, काळुंद्रे, नावडे, कामोठे-१ व कामोठे-२ या क्षेत्रातील २४५ संचिका भूखंड वाटपासाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. या सर्व संचिका भूखंड वाटपासाठी पात्र ठरल्या असल्या तरी त्यासंदर्भातील दावे, वारसा हक्क किंवा इतर हरकती पडताळून पाहिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
साडेबारा टक्के भूखंड योजनेला गती
By admin | Updated: December 26, 2016 06:29 IST