प्राची सोनवणे, नवी मुंबईजन्मापासून विकलांग, त्यामुळे समाजाकडून होणारी उपेक्षा या अशा समस्येच्या गर्तेतील गतिमंद व कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण उजाडणाऱ्या सीबीडीतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान शाळेच्या वतीने विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचा शनिवारी शुभारंभ झाला. शारीरिक दुर्बलतेवर अफाट इच्छाशक्तीने मात करून या शाळेतील विशेष मुलांनी दिवाळीसाठी लागणाऱ्या घरगुती सजावटीचे साहित्य तयार करण्यात आले. सीबीडीतील ‘स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान’ ही विशेष मुलांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी तयार केलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील, दीपमाळा, तोरणे, तरंगत्या मेणबत्त्या, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या साहित्याच्या प्रदर्शनात या विशेष वस्तूंची खरेदी करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे २५वे वार्षिक प्रदर्शन असून, दरवर्षीप्रमाणे या शाळेतील मुलांनी या सर्व वस्तू तयार केल्या आहेत. पणत्या-कंदिलांबरोबरच गृहसजावटीच्या शोभिवंत वस्तू, कृत्रिम दागिने आदी वस्तूंचा डोळे दीपवणारा कलाविष्कार या प्रदर्शनात बघण्यास मिळाला. संस्थेतील मुले पाच ते सहा महिन्यांपासून या वस्तू तयार करण्यात गुंतली होती. या ठिकाणी संस्थेतील विशेष मुले प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे सुहास्य वदनाने स्वागत करीत होती. कोणालाही मदतीची गरज भासली तर धावून जात होती. यावेळी त्यांना गतिमंद का म्हणायचे, असा प्रश्न पडत होता. शाळेतील फाल्गुनी व्होकेनशनल युनिटच्या वतीने या मुलांना वर्षभर विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते.मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्याच दिवशी परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आपण तयार केलेल्या वस्तू विकल्या जात असल्याचे पाहून या निरागस मुलांचे चेहरे आनंदाने उजळत होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुखद हास्य पाहायला मिळत होते. या मुलांना आईच्या ममतेने जपणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शिरीष पुजारी यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुकन्या वैंकटरमण, फाल्गुनी व्होकेशनल युनिटचे सुनीत मारवा तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
दीपोत्सवासाठी ‘विशेष’ पणत्या
By admin | Updated: October 28, 2015 23:33 IST