लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली येथील श्रीराम विद्यालयाबरोबर शुल्कवाढ आणि इतर मुद्द्यावरून पालकांचे सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यवस्थापनाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार ३ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पालक संघटनेने दिला आहे.श्रीराम विद्यालयाच्या व्यवस्थापनाने कोणालाही विश्वासात न घेता, परस्पर शुल्कवाढ केल्याचा पालकांचा आरोप आहे. तसेच दुपारच्या सत्रात सुरू करण्यात आलेल्या वर्गाला पालकांचा विरोध आहे. यासंदर्भात गेल्या वर्षांपासून पालकांचा संघर्ष सुरू आहे; परंतु शाळा व्यवस्थापनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने पालक संघटना आक्रमक झाली आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी शाळा सुरू होताच, पालक व विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन करून आपला निषेध नोंदविला होता. व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले होते; परंतु आता व्यवस्थापनाने घुमजाव करीत दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखविल्याने पालक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार ३ जुलैपासून शाळेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे पालक संघटनेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे आणि मनसेचे नीलेश बाणखेले यांनीही पाठिंबा दिल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रीराम विद्यालयातील आंदोलन चिघळणार?
By admin | Updated: June 30, 2017 03:06 IST