संदीप जाधव, महाड
सगळीकडे दिव्यांनी प्रकाशमान झालेले असताना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तसेच जगदीश्वर मंदिराचा परिसर मात्र काळोखात बुडाला. या किल्ल्याची देखभाल करणाऱ्या केंद्रीय पुरातत्व विभागाने या ठिकाणचे थकीत वीज बिल न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या या निष्काळजीपणाबद्दल गडावर येणाऱ्या शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गडावरील जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवसमाधी या परिसरात तसेच या मार्गावरही गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य पसरलेले आहे. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे गडावरील पाणीपुरवठादेखील बंद आहे. गडावर विद्युत सुविधेसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विद्युत मीटर बसविण्यात आले असूनही विद्युत बिले पुरातत्व विभागामार्फत भरली जातात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेल्या १८ हजार ६३० रुपयांच्या बिलांचा भरणा न केल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केल्याचे उघडकीस आले.गडावरील धान्य कोठारामध्ये थाटलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यालयाचे जानेवारीपासून ५ हजार रुपयांचे वीज बिलही थकीत आहे. गडावरील विद्युत पुरवठा खंडित केल्याने दिवाळीत गड दर्शनासाठी येणाऱ्या शिवप्रेमींची गैरसोय होत असून रात्रीच्यावेळी गडावर काळोखाचे साम्राज्य असल्याने शिवप्रेमींमध्ये पुरातत्व विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.