भाईंदर - पालिकेच्या स्थायीसह वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शनिवारच्या महासभेत जाहीर करण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेना युतीने बहुमताच्या जोरावर स्थायीखेरीज उर्वरित दोन समित्यांतील सदस्यांची संख्या 9 वरून 15 वर नेण्याचा मांडलेला ठराव मान्य झाल्याने अन्य 6 सदस्यांना समितीत काम करण्याची संधी मिळाली.
स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांची मुदत 31 ऑक्टोबरला संपली होती. त्यात भाजपाचे शरद पाटील, रोहिदास पाटील, मीरादेवी यादव, राष्ट्रवादीच्या अनिता पाटील व याच पक्षाकडून पुरस्कृत झालेले बहुजन विकास आघाडीचे राजू भोईर व अपक्ष मुन्ना सिंह, काँग्रेसचे शेख अश्रफ मोहम्मद इब्राहिम व शिवसेनेचे प्रशांत दळवी यांचा समावेश होता. त्यांच्या जागी भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी नगरसेवक प्रशांत केळुसकर, डॉ. नयना वसाणी व भाजपाला पाठिंबा दिलेल्या बहुजन विकास आघाडी (बविआ) चे मोहन जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते बर्नड डिमेलो यांनी स्टिव्हन जॉन मेंडोन्सा, नरेश पाटील व पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह ऊर्फ मुन्ना, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांची नावे महापौर कॅटलिन परेरा यांनी जाहीर केली. तसेच वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बाल कल्याण समितीच्या पूर्वीच्या सदस्यांत वाढ करण्याचा ठराव भाजपाचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते आमदार नरेंद्र मेहता यांनी मांडला असता त्याला शिवसेनेच्या नीलम ढवण यांनी अनुमोदन दिले. या समित्यांतील सदस्य संख्या 9 वरून 15 वर नेण्यात आली. त्यानुसार, वृक्ष प्राधिकरण समितीत भाजपाचे मदन सिंह, दिनेश जैन, सुशीला शर्मा, डिम्पल मेहता व मीरादेवी, राष्ट्रवादीचे रवींद्र माळी, सुरेश खंडेलवाल, आसीफ शेख व वंदना चक्रे, काँग्रेसचे प्रमोद सामंत, रेखा विराणी व मनीषा पिसाळ, शिवसेनेचे प्रशांत दळवी व प्रवीण पाटील आणि बविआचे राजू भोईर यांची निवड करण्यात आली. शिवाय, महिला व बालकल्याण समितीत भाजपाच्या वर्षा भानुशाली, मेघना रावल, सुजाता शिंदे, सीमा शाह व कल्पना म्हात्रे, राष्ट्रवादीच्या दक्षता ठाकूर, शिल्पा भावसार, मेहरुन्निसा सुंबड व सेण्ड्रा रॉड्रिक्स, काँग्रेसच्या मर्लिन डिसा, दीप्ती भट व शर्मिला बगाजी, शिवसेनेच्या शुभांगी कोटीयन व अनिता परमार आणि बविआच्या भावना भोईर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. (प्रतिनिधी)