सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई सीबीडी येथील डोंगर भागात अनधिकृत झोपड्या बांधून विक्रीचा प्रकार सुरू आहे. या झोपड्या ४० हजार रुपये ते दीड लाख रुपयांना विकल्या जात आहेत. यामुळे त्याठिकाणच्या अनधिकृत झोपड्यांमध्ये वाढ होत चालली असून वृक्षतोडही होवू लागली आहे.सीबीडी सेक्टर ८ येथील जय दुर्गामाता नगर, आंबेडकर नगर व संभाजी नगर परिसरात अनधिकृत झोपड्यांची विक्री केली जात आहे. यासाठी भूमाफियांकडून रातोरात झोपड्या उभारण्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील केली जात आहे. यामुळे मागील दीड वर्षात त्याठिकाणी तीन पटीने झोपड्या वाढल्याचे पहायला मिळत आहे. महापालिकेने २००१ साली त्याठिकाणच्या केलेल्या सर्व्हेत तिन्ही नगरमध्ये मिळून सुमारे ५४० झोपड्या नोंदीवर आलेल्या आहेत. त्यांना महापालिकेकडून विविध सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. याच संरक्षित झोपडपट्टी क्षेत्रालगतच अनधिकृत झोपड्या उभारल्या जात असल्याने सद्यस्थितीला त्याठिकाणी दोन हजारहून अधिक झोपड्या दिसत आहेत. भूमाफियांकडून सुरू असलेल्या या प्रकाराला राजकीय वरदहस्त असल्याची देखील परिसरात चर्चा आहे. तर कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीमार्फत या अनधिकृत झोपड्यांची निगराणी होत असल्याचेही सूत्रांकडून समजते.अनधिकृत बांधकामे किंवा झोपड्या नियमित करण्यासंबंधीच्या शासनाच्या भूमिकेवर लक्ष ठेवून असलेल्या व्यक्तीमार्फत हा प्रकार सुरू असल्याची शक्यता आहे. झोपड्यांची विक्री करताना काही वर्षातच त्यांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. याकरिता डोंगर भागातून जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विद्युत वायरींचा आधार घेतला जात आहे. उच्च दाबाची उपरी विद्युत वाहिनी त्याठिकाणावरून नेली जाणार असल्याने या झोपड्या हटवल्या जाणार आहेत. त्यावेळी सदर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा संबंधितांकडून हेतूपुरस्सर पसरवली जात असल्याचीही शक्यता आहे.या अनधिकृत झोपड्यांची विक्री ४० हजार ते दीड लाख रुपयांना करून भूमाफिया करोडो रुपयांचा मलिदा लाटत आहेत. शिवाय झोपडपट्टी खरेदीदाराचा विश्वास संपादित करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर खरेदी - विक्रीचा करार देखील केला जात आहे. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होणाऱ्या करारामध्ये झोपडीचा उल्लेख करून जागेच्या क्षेत्रफळाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. शिवाय अटी व शर्तींमध्ये सिडकोकडून झोपडीधारकाला कोणताही लाभ झाल्यास खरेदीदार त्याला पात्र ठरेल असाही उल्लेख केलेला आहे. या अनधिकृत झोपड्या खरेदी करणाऱ्यांमध्ये अमराठी घटकांचा सर्वाधिक समावेश आहे. अनधिकृत झोपड्यांच्या विक्रीचा घाट घालणाऱ्या भूमाफियांवर सिडको अथवा महापालिकेकडून सक्त कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र झोपड्या उभारल्या जात असतानाही त्याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसत आहे. या झोपड्या विक्री करण्यामध्ये काही महिला व पुरुषांचा समावेश आहे. सदर झोपड्या स्वत:च्या मालकीच्या असून आर्थिक गरजेपोटी त्या विकत असल्याचे सांगून खरेदीदारांची फसवणूक केली जात आहे. याकरिता स्टँपपेपरचा आधार घेत अशिक्षित व गरीब घटकांची घोर फसवणूक केली जात आहे.
भूमाफियांकडून अनधिकृत झोपड्यांची विक्री
By admin | Updated: April 21, 2016 02:57 IST