पनवेल : मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला आयुक्त-सत्ताधारी वाद, आयुक्तांवर आणलेला अविश्वास ठराव, सत्ताधारी भाजपाचे कामबंद आंदोलन या सर्व घडामोडीनंतर गुरुवारी प्रथमच वेगळे चित्र पाहावयास मिळाले. दालनांवरील कामबंद आंदोलनाचे पत्रक हटवून भाजपा पदाधिकाºयांची आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची एकत्रित बैठक पार पडली.पालिका क्षेत्रात सिडकोने कचरा उचलण्यास बंद केल्याने उद्भवलेल्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी पालिकेत ही बैठक पार पडली. या बैठकीला आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त संध्या बावनकुळे, नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, नीलेश बाविस्कर आदींसह भाजपाचे नगरसेवक व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे देखील उपस्थित झाल्याने सत्ताधाºयांच्या भुवया उंचावल्या. या प्रश्नी शुक्र वारी स्थायी समिती बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीत कचरा प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील महिन्यात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महासभेतून सभात्याग केला होता. यानंतर पार पडलेल्या तीन तहकूब महासभा, एक विशेष सभा घेण्यात आली होती. या सर्वच ठिकाणी आयुक्त शिंदे अनुपस्थित राहिले होते. आजच्या बैठकीत सत्ताधारी भाजपा व आयुक्त एकत्र आले होते.
आयुक्तांविषयी सत्ताधाऱ्यांची भूमिका मवाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:29 IST