कळंबोली : रोडपालीतील सेक्टर २० ला वीजपुरवठा करणारे रोहित्र असुरक्षित आहे. त्या ठिकाणी कुंपण नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांची जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून उपाययोजना करण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. जर अपघात घडला तर यास कोण जबाबदार असा सवाल सुद्धा नागरिकांनी केला आहे.भूखंड क्र मांक -३७ वर गिरीराज बिल्डिंग आहे, आणि त्यालाच लागून सेक्टर २0ला पुरवठा करणारे रोहित्र बसविण्यात आलेले आहे. मात्र ते दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. रोहित्राच्या बाजूला मोकळ्या जागेत डेब्रिज आणि बांधकाम साहित्य टाकले जाते. तसेच कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आजूबाजूला गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. वीजवाहिन्या लोंबकळताना दिसतात. विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला सिद्धी विनायक हाईट्स ही इमारत आहे. या ठिकाणी तीन-चार वेळा स्पार्क होवून आग लागण्याचा प्रकारसुद्धा घडला होता.महत्त्वाची बाब म्हणजे रोहित्र असलेल्या या भूखंडाला कुंपण नाही त्यामुळे अनेकदा लहान मुले चेंडू गेला म्हणून तिथे जातात. त्यावेळी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तरी या ठिकाणी साफसफाई करून कुंपण लावण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली असल्याचे गिरीराजमधील रहिवासी चंद्रकांत राऊत यांनी केली आहे.
रोडपालीत रोहित्रामुळे नागरिकांच्या जीवास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:20 AM