म्हसळा : म्हसळा ते माणगांव व म्हसळा ते दिघी बंदर (दिघी पोर्ट) कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हरिहरेश्वर - सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगरकडे जाणाऱ्या हजारो भक्तांना या रस्त्याचा मोठा अडसर होत असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे येथून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.म्हसळ्यातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी अवस्था झाली आहे. दिघी ते माणगाव हा सुमारे ५६ ते ५७ किमीचा रस्ता असून, यातील काही भाग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आखत्यारीत आहे, तर दिघी ते चांढोरे हा भाग सुरु वातीला मेरीटाइम बोर्डाकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर तो दिघी पोर्टकडे देखभालीसाठी सुपुर्द करण्यात आला. एप्रिल २०१६ च्या अखेरीस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हसळा चेक पोस्ट ते दिघी नाका या रस्त्यासाठी एक कोटी खर्च करण्यात आले, परंतु साधारण दीड ते पावणेदोन महिन्यात या रस्त्यावर खड्डे पडून चाळण झाली. दिघी नाका ते दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था याहीपेक्षा बिकट आहे. (वार्ताहर)
म्हसळ्यात रस्त्यांची दुरवस्था
By admin | Updated: July 13, 2016 02:06 IST