नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही. नाल्यांमध्ये गाळ कायम असून, पावसाळ्यात पुन्हा पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरी वसाहतीसह एमआयडीसीतील कारखान्यांमध्येही पाणी जाण्याची शक्यता आहे. माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून छायाचित्रांसह वस्तुस्थिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.नवी मुंबई मनपा क्षेत्रामध्ये दिवा ते दिवाळे दरम्यान खाली किनारा व दिघा ते बेलापूर दरम्यान डोंगर रांग अशी निसर्गाची देणगी लाभली आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. या वर्षी नालेसफाईची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. नाल्यांमधील गाळ तसाच आहे. अनेक ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. गतवर्षी मुसळधार पावसाचे पाणी बोनसरी व इतर ठिकाणी नागरी वसाहतीमध्ये गेले होते. काही कारखान्यांमध्येही पाणी शिरले होते. यामुळे या वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची दुरुस्ती, गाळ काढणे ही कामे करण्याची मागणी केली होती. प्रशासनानेही कामे केल्याचे सांगितले होते. माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसराचा दौरा केला असता, कामे निकृष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांची छायाचित्रे व कामांविषयी वस्तुस्थिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. निकृष्ट कामांमुळे पावसाळ्यात कारखान्यांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले, तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही माजी उपमहापौरांनी दिला आहे. याविषयी आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.>पावसाळापूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ तसाच असून, पावसाचे पाणी कारखाने व नागरी वसाहतीमध्ये जाण्याची शक्यता आहे. याविषयी सर्व छायाचित्रे आयुक्तांना पाठविली आहेत. निकृष्ट कामांमुळे काही नुकसान झाल्यास, त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असणार आहे.- मंदाकिनी रमाकांत म्हात्रेमाजी उपमहापौर
निकृष्ट नालेसफाईमुळे पुराचा धोका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:23 IST