पनवेल : गेल्या काही दिवसांपासून आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त असलेल्या पनवेलकरांना रविवारी परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे व्यापारी तसेच प्रवाशांची तारांबळ उडाली. शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमुळे अंगाची लाही लाही होत आहे. रविवारी चारच्या सुमारास वादळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. नवीन पनवेल, खांदा वसाहत, पनवेल शहरातील सखल भागात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीत अडचणी येत होत्या. रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला, तर बच्चे कंपनीच्या पावसात फुटबॉल मॅच रंगलेल्या दिसल्या. शहरात रविवारी दुपारी अचानक आलेल्या मोठ्या सरींमुळे नवी मुंबई चांगलीच गारेगार झाली. शहरातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आॅक्टोबर हीट सहन करणाऱ्या नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. संध्याकाळी पुन्हा पावसाने रिपरिप करून सर्व वातावरण थंड करून टाकले. दुपारी अचानक मोठी सर आल्याने छत्री घरीच विसरलेल्या नागरिकांची धांदल उडाली, तर काहींनी आडोसा शोधत पावसाचा आनंद लुटला. तासभर पावसाची ही रिपरिप सुरूच होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.पावसापूर्वी काही काळ जोरदार वाऱ्यासह वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले होते. शहरातील बऱ्याच ठिकाणी विजेची समस्या निर्माण झाल्याने सुटीचा आनंद घेणाऱ्या नोकरदारवर्गाला विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली असताना अचानक आलेल्या या पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा पसरला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारचे तापमान अतिशय कमी असून नवी मुंबईत कमाल तापमान ३३.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.० अंश सेल्सिअस असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली या भागात तासाभरात २.५० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.
परतीच्या पावसाने तारांबळ
By admin | Updated: October 26, 2015 01:10 IST