- नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेविषयी नगरसेवकच उदासीन असल्याचे निदर्शनास आले. ११६ नगरसेवकांपैकी फक्त ८७ जणांनीच सभागृहात हजेरी लावली. ३६ जणांनी चर्चेत सहभाग घेतला. तर सभेच्या अखेरीस फक्त २० सदस्य उपस्थित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील १२ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू आहे. शहरवासी भयभीत झाले आहेत. जागृत नगरसेवकांनी याविषयी विशेष सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले असताना बहुतांश सदस्यांनी मात्र आरोग्याच्या विषयाकडेही दुर्लक्ष केले. ११ वाजता सभेचे आयोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात एक तास उशिरा कामकाज सुरू झाले. सभागृहात निवडून आलेले १११ व ५ स्वीकृत असे ११६ नगरसेवक आहेत. त्यामधील फक्त ८७ जणच हजर होते. २९ नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. प्रत्येक तासानंतर सदस्यांची संख्या कमी होवू लागली. अनेकांनी स्वत:चे भाषण झाले की घरी जाणे पसंत केले. रात्री सभा संपली तेव्हा २० जणच हजर होते. दिवसभरात फक्त ३६ जणांनीच चर्चेत सहभाग घेतला. उर्वरित ८० जणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. आरोग्याच्या सभेमध्ये अनेक नवीन नगरसेवकांनी त्यांची मते व्यक्त केली. संगीता अशोक पाटील, सायली शिंदे, ऋचा पाटील या पहिल्यांदा सभागृहात आलेल्या नगरसेविकांनीही चांगल्या सूचना केल्या. शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असताना सर्व नगरसेवक अभ्यासपूर्वक मते व्यक्त करतील. अनागोंदी कारभार करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. परंतु नगरसेवकच उदासीन असल्यामुळे या सभेतून काहीच निष्पन्न झाले नाही.सहभाग घेतलेले नगरसेवक मनीषा भोईर, उषा भोईर, सरोज पाटील, घनश्याम मढवी, एम. के. मढवी, संजू वाडे, ऋचा पाटील, राजू शिंदे, भारती पाटील, हेमांगी सोनावणे, सायली शिंदे, निवृत्ती जगताप, मोनिका पाटील, रंगनाथ औटी, गणेश म्हात्रे, सूरज पाटील, रामचंद्र घरत, उज्ज्वला झंझाड, किशोर पाटकर, संगीता वास्के, राधा कुलकर्णी, संगीता पाटील, गिरीष म्हात्रे, दीपक पवार, नेत्रा शिर्के, विजय चौगुले, जे. डी. सुतार, अविनाश लाड, रवींद्र इथापे, दिव्या गायकवाड, नवीन गवते, रामदास पवळे, पूनम पाटील, चेतन नाईक, करण मढवी, मेघाली राऊत.
आरोग्याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन
By admin | Updated: September 15, 2015 23:27 IST