पनवेल : तालुक्यातील जुई-कामोठे गावालगतच्या खाडीत मागील काही दिवसांपासून अवैध्य वाळूउपसा होत आहे. यासंदर्भात मोहीम उघडत साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा या ठिकाणी धाड टाकत २०० ब्रास रेती, सक्शनपंप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुई-कामोठे हे गाव कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. परिमंडळ २ चे साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह ही कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सक्शनपंपदेखील जप्त करण्यात आले. पनवेल परिसरातील मोठ्या कारवाईपैकी ही एक कारवाई असल्याचे बोलले जाते. या कारवाईत होड्या, सक्शनपंप मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून, ही संख्या ५०च्या आसपास आहे. या ठिकाणी रेती उत्खनन करणाऱ्या मजुरांना या कारवाईची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. (प्रतिनिधी)
वाळूमाफियांवर धाड
By admin | Updated: October 17, 2015 02:09 IST