सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई यंदाचा दहीहंडी व गणेशोत्सव रस्त्याऐवजी मैदानातच साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी सार्वजनिक मंडळांना केल्या आहेत. त्यामुळे आयोजक मंडळांची जागेसाठी धावपळ सुरू झाली आहे. परिणामी मैदान आरक्षणात राजकीय कुरघोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाचा गणेशोत्सव व दहीकाला नागरिकांना विघ्नमुक्त करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे. रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होवून इतरही अनेक समस्या उद्भवतात. अनेकदा रुग्णवाहिका देखील अशा उत्सवाच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीमध्ये अडकून रुग्णाच्या उपचारात बाधा येत असते. त्यामुळे यंदा रस्त्यावर मंडप घालून उत्सव करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांवर येवून ठेपलेली दहीहंडी व गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी तशा सूचनाही केल्या आहेत. रस्ता अडवून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना लगतच्या मैदानाचा पर्याय पोलिसांनी सुचवलेला आहे. त्यानुसार काही मंडळांनी पोलिसांना प्रतिसाद देत रस्त्यावरील मंडप हटवून लगतच्या मैदानात उत्सवाची तयारी सुरू केली आहे.पोलिसांच्या या निर्णयामुळे काही मंडळांना राजकीय कुरघोडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मंडळांचे दहीहंडी अथवा गणेशोत्सव रद्द होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापैकी निम्याहून अधिक मंडळांचे मंडप प्रतिवर्षी रस्ता अडवून थाटले जातात. शहरातल्या अनेक ठिकाणी एकाच रस्त्यावर थोड्याफार अंतरावर दोन किंवा अधिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र रस्ता अडवून गणेशोत्सव साजरा करण्यावर यंदा पोलिसांनी हरकत घेतल्याने यावेळी त्यांना हे शक्य नाही. रस्त्याऐवजी मैदानात गणेशोत्सव साजरा करण्याच्या सक्त सूचना पोलिसांनी दिल्याने अनेक मंडळांनी नेहमीच्या जागेलगतच्या मैदानांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे विभागात उपलब्ध असलेल्या मैदानावर एक ते पाच मंडळांना आरक्षणासाठी दावा करावा लागणार आहे. बहुतांश ठिकाणी वर्षानुवर्षे उत्सव साजरा करणारी बरीच मंडळे आहेत. मुळात शहरात विभागनिहाय मोकळ्या मैदानांची कमतरता आहे. ठरावीक ठिकाणी एक ते दोनच मैदाने असल्याने ती मिळवण्यासाठी चढाओढ होणार आहे. शहरातल्या प्रत्येक विभागात हीच परिस्थिती असल्याने बहुतांश मंडळांपुढे जागेची समस्या भेडसावणार आहे. दहीहंडी अथवा गणेशोत्सवात राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाला खीळ देखील बसवू शकते. उत्सवासाठी मैदान मिळवणाऱ्या मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांना उत्सवासाठी पर्यायी दुसऱ्या जागेचा शोध घेणे अथवा कार्यक्रमच रद्द करणे भाग पडणार आहे. तसे झाल्यास शहरातील सार्वजनिक मंडळांकडून साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची संख्या देखील घटण्याची शक्यता आहे.
मैदानासाठी धावाधाव
By admin | Updated: September 1, 2015 04:49 IST