अरुणकुमार मेहत्रे /लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने पाठीशी राहिलेल्या नवीन पनवेलकरांना महापालिकेत झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल यांना तर उपमहापौरपदाची लॉटरी अॅड. मनोज भुजबळ यांनी लागण्याची दाट शक्यता आहे. परेश ठाकूर यांच्याकडे स्थायी समितीची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.पनवेल महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. नवीन पनवेल, कामोठे आणि खारघरमध्ये विरोधी पक्षांना पराजीत करण्यास कमळाला यश मिळाले आहे. नवीन पनवेल आणि खारघरमध्ये भाजपाने शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीला व्हाईट वॉश दिले आहे. नवीन पनवेलकर गेल्या दहा वर्षांत आ. प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी राहिलेले आहेत. येथून नगरपालिका, विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळत आले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि सुनील घरत यांच्यामुळे नवीन पनवेलच्या काही भागावर शेकाप व राष्ट्रवादीचा प्रभाव होता. परंतु अॅड. मनोज भुजबळ यांनी संदीप पाटील यांचा पराभव करून मोठा धक्का दिला. त्याचबरोबर सुनील घरत यांची मुलगी शिवानीसह आघाडीच्या इतर उमेदवारांनाही घरी बसावे लागले. प्रभाग क्र मांक सतरामधील लढत अतिशय प्रतिष्ठेची होती. त्यामध्ये अॅड. भुजबळ यांची सरशी झाली त्याचबरोबर त्यांनी दोन माजी नगराध्यक्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यानुसार त्यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या संतोष शेट्टी यांच्या नावाचाही विचार होवू शकतो.
सत्तेच्या चाव्या नवीन पनवेलकरांच्या हातात?
By admin | Updated: June 1, 2017 05:42 IST