अलिबाग : पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषण करणारे रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, तर दुसरीकडे उपोषण करणारेच विकासकामात अडथळा आणत असल्याचा आरोप करणारे ग्रामस्थ असे चित्र शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. शेकाप आणि काँग्रेस या प्रश्नी आमनेसामने आल्याने पाणीपुरवठा योजनेतील घोटाळ््याविरोधातील उपोषण आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उपोषण करणारे मच्छिंद्र पाटील हेच कसे दोषी आहेत हे उघड करण्यासाठी काही ग्रामस्थांनी शेकापचे नेते अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांची शुक्रवारी भेट घेतली. शेकापची ही चाल म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. मच्छिंद्र पाटील हे सातत्याने माहिती मागत असतात. त्यामुळे विकासकामात अडथळा निर्माण होतो. त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी केली. माहिती मागणे हा त्यांचा हक्क आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांना माहिती द्यावीच लागेल, असे जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी शेकापच्या नेत्यांना सांगितल्याचे समजते. पाटील हे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा दिला आहे.
आंदोलन चिघळण्याची शक्यता
By admin | Updated: March 12, 2016 02:09 IST