म्हसळा : तालुक्यातील खारगांव खुर्द येथील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी खारगांव खुर्द जिल्हा परिषद शाळेतील सावित्रीबाई फुले स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान दिले.रॅलीमध्ये खारगांव खुर्द ग्रामपंचायत सरपंच मीरा म्हात्रे, उपसरपंच पुष्पा लोणशिकार, कृष्णा म्हात्रे, केंद्रप्रमुख धर्मा धामणकर, संगीता धामणकर, अंगणवाडी सेविका सोनाली साळवी, माया खोत, वनिता पाटील, पालक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच मीरा म्हात्रे म्हणाल्या की, आपला देश पोलिओमुक्त होण्यासाठी संपूर्ण भारत देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाते. समाजातील काही लोकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहेत. त्यासाठी अत्यंत प्रभावी व लसीकरण मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती व मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले स्काऊट गाइडचे विद्यार्थी व शाळेचे शिक्षकवृंद यांचे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जनजागृती रॅली काढल्याबद्दल आभार मानले. (वार्ताहर)
पोलिओ जनजागृती रॅली
By admin | Updated: March 2, 2016 02:11 IST