अलिबाग : एका अविवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलबरोबर अत्यंत जवळिकीचे संबंध असणाऱ्या दोघा विवाहित पोलीस कॉन्स्टेबल्समधील वादातून एका पोलीस कॉन्स्टेबलकडून दुसऱ्याचा रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातच घातपात करुन खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबतची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास येथील रायगड पोलीस मुख्यालयातील विसावा रेस्टहाऊससमोरील रस्त्यावर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात असलेले व प्रशिक्षणाकरिता पोलीस मुख्यालयात आलेले पोलीस कॉन्स्टेबल नितेश पाटील (मूळ रा.रोडा काशमिरे ता.पेण) यास ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल क्र. एमएच ०६ बीजे ३१५२ हिच्यामध्ये स्फोटक पदार्थ ठेवून त्याचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटामध्ये पोलीस कॉन्स्टेबल नितेश पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देवून तत्काळ कामोठे (पनवेल) येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी पोलीस कॉन्स्टेबल नितेश पाटील यांचा तेथे बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांनी सांगितले.संशयास्पद आणि गुंतागुंत असलेल्या या गुन्ह्याच्या तपासाकरिता तातडीने विशेष पोलीस तपास पथक तैनात करुन तपास तत्काळ सुरु केला असता. मृत पोलीस कॉन्स्टेबल नितेश पाटील याचे मोबाइल फोन रेकॉर्ड तपासले असता, खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कॉन्स्टेबलबरोबर त्याचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. ‘त्या’ महिला कॉन्स्टेबलबरोबर असणारे जवळिकीचे संबंध मृत नितेश पाटील याने थांबवावे अन्यथा ठार मारीन अशी धमकी खालापूरच्या पो.कॉ.ने दिल्याचे पुराव्यांसह स्पष्ट झाले. त्याचबरोबर मृत पो.कॉ. नितेश पाटीलच्या मोटारसायकलला जाणीवपूर्वक स्फोट घडविण्याच्या उद्देशाने स्फोटक लावण्याकरिता वायरिंग केल्याचे देखील तपास पथकास निष्पन्न झाले.सुकृतदर्शनी वैयक्तिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे दिसत असून एका पोलीस कॉन्स्टेबलचा खात्रीशीररित्या सहभाग दिसून आल्याने खालापूरच्या त्या पो.कॉन्स्टेबलला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता आपण गुन्हा केला असल्याची कबुली पोलीस तपास पथकास देवून गुन्हा कसा केला याची सर्व माहिती दिली असल्याचे हक यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
पोलीस कॉन्स्टेबलचा खून
By admin | Updated: October 29, 2015 23:36 IST