पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील पडघे गावातील कुत्र्यावर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केल्याने गेल्या १५ दिवसांत दहापेक्षा जास्त कुत्रे दगावल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. ग्रामस्थ सुनील भोईर यांनी यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. १५ दिवसांत तोंडाला फेस येऊन कुत्रे मृत पावत असल्याची बाब भोईर यांच्या निदर्शनास आली. अशाप्रकारे मुक्या प्राण्यांवर विषप्रयोग केल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. पडघे परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्याची संख्या जास्त आहे. त्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत असून त्याच रागातून अज्ञाताने विषप्रयोग केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पनवेलमध्ये काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी ३५ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. यानंतर शहरात महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वमूमीवर कुत्र्यांवर विषप्रयोग झाल्याने शहरात खळबळ उडाली असून, या घटनेची चौकशी करून विषप्रयोग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
विषप्रयोगामुळे दहा कुत्र्यांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:44 IST