कांता हाबळे, नेरळकर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी एकनंतर डॉक्टर नसल्याने डॉक्टर नाहीत, तुम्ही घरी जा आणि उद्या या, असा सल्ला येथील कर्मचारी रु ग्णांना देत आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असून जादा पैसे खर्च करावे लागत आहेत. तसेच येथे रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईन संपले आहे, गोळ्या घ्याव्या लागतील असाही सल्ला देण्यात येतो. त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून परिसरातील अनेक गावातील रु ग्ण नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार मिळतील या आशेने येत असतात. परंतु येथे आल्यावर इंजेक्शन नाही, सलाईन संपले आहे, डॉक्टर नाहीत अशी अनेक कारणे देऊन येथील कर्मचारी रु ग्णांना घरी जाण्याचा सल्ला देत आहेत. मग नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र गोर-गरिबांच्या सेवेसाठी का फक्त दिखाऊपणा असा प्रश्न रु ग्ण व त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असून येथे जंगल आहे. त्यामुळे परिसरात विंचू, सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी त्यावर उपचार होण्यासाठी असे डोस (इंजेक्शन) रुग्णालयात असणे गरजेचे आहे. परंतु असे रु ग्ण आल्यास उल्हासनगर येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो.नेरळ परिसरातील गोर -गरीब गरजू रु ग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. परंतु नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच रु ग्णांना सोयी -सुविधा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी वैद्यकीय अधिकारी पद रिक्त तर कधी कर्मचाऱ्यांची पदे अपूर्ण अशा एक ना अनेक समस्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष देऊन येथे येणाऱ्या रुग्णांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात अशी मागणी रु ग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे व त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल
By admin | Updated: August 9, 2016 02:31 IST