नवी मुंबई : नेरुळच्या सेंट आॅगस्टीन शाळेविरोधात सोमवारी पालकांनी आंदोलन केले. शाळेने लादलेली वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह शाळेबाहेर आंदोलन केले.सेंट आॅगस्टीन शाळेमध्ये प्रतिवर्षी फीमध्ये भरमसाट वाढ केली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तर फी वाढ करताना पालकांनाही विश्वासात घेतले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शाळेला न जुमानता अनेक पालकांनी वाढीव शुल्क भरण्यास नकार दिला आहे. मात्र त्याचा राग शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांवर काढत असून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचाही पालकांचा आरोप आहे. फी न भरलेल्या मुलांना परीक्षेसाठी जमिनीवर बसवले जाते. शिवाय ऐन वेळी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पळवून शारीरिक तसेच मानसिक त्रासही दिला जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी आम आदमी पक्षाचे संयोजक मयूर पंगाल यांच्या नेतृत्वाखाली शाळेसमोर आंदोलन केले. त्यामध्ये १०० हून अधिक पालक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना त्याठिकाणी हस्तक्षेप करावा लागला. वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांनी शाळा व्यवस्था केल्या. त्यानुसार मंगळवारी शिक्षण अधिकारी, शाळा व्यवस्थापन व पालक यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक निश्चित झाल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.
फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन
By admin | Updated: November 3, 2015 00:59 IST