लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: खारघर शहरात पाणथळ जागेत नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात सोनेरी कोल्हे पाहिले जात असल्याचे पहावयास मिळत असताना.दि.12 रोजी प्राणिमित्रांना अनोखे दृश्य पहावयास मिळाले.खारघर सेक्टर 16 याठिकाणी सोनेरी कोल्हा आणि कुत्रा एकत्रित बागडताना दिसले.
सध्या पडणारी गुलाबी थंडी यामुळे मोठ्या प्रमाणात सोनेरी कोल्हे खारघर शहरात खाडीकिनारी पाहिले जात आहेत.देशी विदेशी पक्षांचे आगमन खाडीकिनारच्या पाणथळ जागेत होत असल्याने पक्षी आणि प्राणिमित्रांना शहरात या निरीक्षणाची पर्वणी निर्माण झाली आहे.नजीकच्या सोनेरी कोल्हे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत दिसू लागले आहेत.यापूर्वी सेंट्रल पार्क मध्ये पाहिले गेलेले कोल्हे गुरुवारी सकाळी कुत्र्यासोबत बागडताना दिसून आले.सेक्टर 16 वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस सकाळी 7 च्या सुमारास कोल्हा आणि कुत्रा दिसून आला.खारघर खाडीत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.विशेष म्हणजे खारघर आणि तळोजा ला जोडणारा खाडीपुलाचे काम याठिकामी युद्धपातळीवर सुरु आहे.यामुळे होणाऱ्या आवाजामुळे खारफुटीतील सोनेरी कोल्हे खारघर शहरात शिरकाव करीत आहेत.
विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात निसर्गाचा ह्रास सुरु आहे.खारफुटीचे जंगल दररोज तोडले जात असल्याने कोल्हे मानवी वस्तीत येत आहेत.यामुळेच मोकाट कुत्र्यांच्या कळपात कोल्हे शिरत आहेत.हे धोकादायक असून वनविभागाने याबाबत वेळेत पाऊले उचलावीत.आम्ही याबाबत लढत असून आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. - सीमा टॅंक(प्राणीमित्र ,खारघर )