नवी मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व महानगरपालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. ५० लाख रुपयांची खंडणी मागितली असून, न दिल्यास बदनामी करण्याची व ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.ऐरोलीमधील सुनील चौगुले स्पोर्ट क्लबच्या परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी विजय चौगुले यांच्या नावाने बंद पाकीट ठेवले होते. कर्मचाऱ्यांनी हे पाकीट व्यवस्थापनाकडे दिले. त्यामध्ये चौगुले यांचे फोटो व पत्र होते. तुमचे तरण तलाव व इतर ठिकाणचे फोटो आमचे आहेत.हे सर्व फोटो यूट्यूब, समाज माध्यमे व तुमच्या प्रभागामध्ये पाठवून बदनामी केली जाईल. बदनामी टाळायची असेल, तर ५० लाख रुपये द्या. कुठे व कोणाकडे पैसे द्यायचे ते तुम्हाला समजेलच, असा इशाराही दिला आहे. यापूर्वी आम्ही तुला ठार मारण्याचे ठरविले होते, पण कार्यक्रमात गर्दी असल्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचता आले नाही, असेही या पत्रामध्ये म्हटले होते.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजय चौगुले यांनी याविषयी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. मिळालेले फोटो व धमकीचे पत्रही दिले आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल व आरोपी समोर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना धमकी, ५० लाख खंडणी मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:31 IST