नवी मुंबई : निवडणुकांपासून शिवसेना - भाजपा नगरसेवकांनी पालिका सभागृहात राष्ट्रवादी काँगे्रसला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांना घेराव घातला जात आहे. विरोधकांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला असून स्मार्ट सिटी प्रस्तावावर चर्चा करण्याच्यावेळी सेना नगरसेवकाने चक्क सभागृहातच शर्ट काढला. वाशीत आंदोलन करताना पहिल्या महिला स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांचाही अवमान करणारे शब्द वापरले असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला बहुमत मिळाले नाही. अपक्ष व काँगे्रसच्या साथीने सत्ता मिळविली आहे. परंतु सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षात अनेक अभ्यासू व ज्येष्ठ नगरसेवक आहेत. यामुळे सभागृहात विरोधकांची वारंवार कोंडी केली जात आहे. सुरवातीला सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी होत होत्या. परंतु नंतर विरोधक महापौरांसमोरच्या जागेत उभे राहून त्यांचा विरोध नोंदवू लागले. मागील काही महिन्यांपासून मात्र क्षुल्लक कारणांवरूनही शिवसेना व भाजपाचे नगरसेवक महापौरांच्या खुर्चीजवळ जावून त्यांना घेराव घालत आहेत. अनेक वेळा त्यांच्यासमोर जावून त्यांच्याशी मोठ्या आवाजात भांडण केल्यासारखे हातवारे केले जात असतानाचे चित्र पहावयास मिळू लागले आहे. विरोधक त्यांचे मत मांडण्यापेक्षा स्टंटबाजी करण्यात धन्यता मानू लागले आहेत.स्मार्ट सिटीविषयी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेतही महापौरांना घेराव घातलाच शिवाय माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांनी शर्ट काढून निषेध नोंदविला. वास्तविक त्यांनी शर्ट काढून निषेध करावा असे काहीही घडले नव्हते. यामुळे सभा ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली असून स्टंटबाजीसाठी महापौरांचा व सभागृहाचा अपमान केला जात असल्याचे मत व्यक्त केले आहे. निवडणुकीपासून सभागृहात गोंधळ करणारे विरोधक आता आंदोलनाच्या दरम्यानही आक्रमक होवू लागले आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीवर टक्केवारीचा आरोप केला जात होता. परंतु गुरूवारी वाशीतील शिवाजी चौकात झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत आरोप करण्यात आले. निषेधाच्या फलकावर स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांना उद्देशून नेत्रे... आपल्याला पाच टक्के नाही तर स्मार्ट सिटीही नाही. हो गणोबा, जय गणोबा. गणोबा प्रसन्न... आम्ही पाच टक्के असे फलक झळकाविले. वास्तविक नेत्रा शिर्के या पहिल्या महिला स्थायी समिती सदस्य आहेत. त्या सभापती झाल्यानंतर टक्केवारी थांबल्याचे प्रशस्तिपत्रक खुद्द भाजपा नगरसेवकानेच दिले आहे. सभागृहात यापूर्वी सभापतींना धारेवर धरणारे शिवराम पाटील यांच्यासारखे नगरसेवकही सौजन्याने वागतात. परंतु आंदोलनादरम्यान नेते व कार्यकर्त्यांनी चुकीचे फलक दाखविल्याविषयी शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिला पदाधिकाऱ्यांचा अवमान करणे ही शिवसेनेची संस्कृती नसल्याचे मत व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
विरोधकच बनले गोंधळी
By admin | Updated: December 12, 2015 01:49 IST