नवी मुंबई: गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ९५,२४० पेट्या आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये ६७,०९६ पेटी कोकणातील हापूसचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रमी आवक झाली आहे. यामुळे यावर्षी मुंबई, नवी मुंबईकरांना पुरणपोळीसोबत आंबरसाचा स्वादही घेता येणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगामात गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी पाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते.
यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, एप्रिलच्या सुरुवातीला ५० हजार पेट्यांचा टप्पा ओलांडला होता. सोमवारी गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर बाजार समितीमध्ये ९५,२४० पेट्या आंब्याची आवक झाली आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातून ६७,०९६ पेट्या हापूस आंबा व इतर राज्यांमधून २८,१४४ पेट्यांची आवक झाली आहे. या हंगामातील ही सर्वाधिक आवक असल्यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार समितीमध्ये हापूसबरोबर बदामी, तोतापुरी, लालबाग, कर्नाटकी आंब्यांची आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभावही नियंत्रणात आले आहेत. गुढीपाडव्याला सर्व नागरिकांना आंब्याचा स्वाद घेता येणार आहे. अनेक घरांमध्ये पुरणपोळी व आंबरसचा बेत आखण्यात आला आहे.
पाडव्यालाही ५० हजारचा टप्पा ओलांडणारसोमवारी ९५ हजार पेट्यांची आवक झाल्यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातारण आहे. गुढीपाडव्यालाही मार्केट सुरू राहणार आहे. पाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशीही किमान ५० ते ५५ हजार पेट्यांची आवक होईल, असा अंदाज बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केला आहे.
बाजार समितीमधील आंब्याचे दर
- हापूस - २५० ते ८०० रुपये डझन
- कर्नाटक - ७० ते १२० रुपये किलो
- बदामी - ६० ते १०० रुपये किलो
- तोतापुरी - ४० ते ५० रुपये किलो
- लालबाग - ६० ते ८० रुपये किलो