कमलाकर कांबळे, नवी मुंबईतोट्यात चालेल्या परिवहन उपक्रमाचा कारभार सुधारण्यासाठी एनएमएमएटी व्यवस्थापनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अधिकाधिक प्रवाशांनी परिवहन सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून व्यवस्थापनाने ३ डिसेंबर रोजी बस डे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी नवी मुंबईकरांनी खासगी वाहनांऐवजी परिवहनचा वापर करावा, असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.परिवहनच्या ताफ्यात साध्या व वातानुकूलित अशा एकूण ३00 बसेस आहेत. मुंबई, ठाणे, पनवेलसह नवी मुंबई परिसरातील ५१ मार्गांवर या बसेस धावतात. या बसेसमधून दरदिवसी २ लाख ४0 हजार प्रवासी प्रवास करतात. गेल्या वर्षभरात व्यवस्थापनाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे परिवहनच्या सेवेकडे प्रवाशांचा ओढा वाढू लागला आहे. याचा परिणाम म्हणून उपक्रमाला होणारा तोटाही काही प्रमाणात कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रवाशांनी एनएमएमटीचा वापर करावा, यादृष्टीने उपक्रमाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार येत्या ३ डिसेंबर रोजी बस डे साजरा करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. वाशी डेपोत महापौर सुधाकर सोनवणे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे तसेच परिवहन सभापती साबू डॅनियल यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या दिवशी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर न करता परिवहनच्या बसेमधून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. एक दिवस प्रवाशांनी खासगी वाहनांऐवजी परिवहनचा वापर करावा, ही यामागची संकल्पना आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी करणे, इंधनाची बचत व प्रदूषणाला आळा घालणे हे यामागचे मुख्य उद्देश असल्याची माहिती एनएमएटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.
एनएमएमटी करणार ‘बस डे’चे आयोजन
By admin | Updated: November 2, 2015 01:50 IST