बॉलीवूडमध्ये लोकांना स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी एक संधी मिळविताना अनेक वर्षे लागतात. काही लोक असेही असतात, ज्यांना सतत संधी मिळत असते, तरीही ते त्या संधीचा उपयोग करून घेऊ शकत नाहीत. अशा काही लोकांच्या यादीत दिग्दर्शक निखिल अडवाणींचे नावही आले आहे. गेल्या आठवड्यात निखिल यांनी दिग्दर्शित केलेले दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ११ सप्टेंबर रोजी ‘हीरो’ तर गेल्या शुक्रवारी ‘कट्टी-बट्टी’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला.बॉक्स आॅफिसकडून या दोन्ही चित्रपटांचे निराशाजनक वृत्त आले आहे. सलमान खान प्रॉडक्शन कंपनीद्वारे तयार करण्यात आलेला बहुचर्चित ‘हीरो’ हा चित्रपट ‘फ्लॉप’च्या यादीत जाऊन बसला आहे. आता ‘कट्टी-बट्टी’ची स्थितीही चांगली नाही. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन कमजोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही चित्रपटांत दिग्दर्शक म्हणून निखिल अडवाणी आपली जबाबदारी सांभाळण्यात अपयशी ठरले. दोन आठवड्यांत २ मोठे ‘फ्लॉप’ देणाऱ्या निखिल यांच्यावर आता कोण ‘डाव’ लावील हे सांगणे तर दूरच, पण विचार करणेही कठीण आहे.निखिल यांचे हे पहिले अपयश नाही. त्यांना पहिली संधी करण जोहरने दिली होती. ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’च्या वेळी ते करण जोहरचे मुख्य सहायक दिग्दर्शक होते. ‘कल हो न हो’मध्ये त्यांच्यावर दिग्दर्शकाची जबाबदारी देण्यात आली होती. शाहरूख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या भूमिका असलेल्या त्रिकोणीय प्रेमकथेला बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळाले होते. हा चित्रपट पाहताना पडद्यामागून करण जोहर यांनीच दिग्दर्शन केल्याची चर्चा सुरू झाली होती. या चित्रपटावर करण जोहरच्या दिग्दर्शनाची पूर्ण छाप होती.‘कल हो न हो’ या चित्रपटानंतर करणने निखिलसोबत कधीही काम केले नाही. पण काही काळानंतर दोघांतील मतभेद कमी-कमी होत गेले. करण जोहरच्या कंपनीतून बाहेर पडून निखिल अडवाणी यांनी रस्ता शोधण्यास प्रारंभ केला. येथे त्यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली. ‘कल हो ना हो’नंतर निखिल यांनी मल्टीस्टार कास्ट ‘सलाम-ए-इश्क’ (सलमान खान, अनिल कपूर), गोविंदा, प्रियंका चोप्रा, जुही चावला, अक्षय खन्ना, जॉन अब्राहम, बालन) बनविला; परंतु बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट ‘फ्लॉप’ ठरला. ‘सलाम-ए-इश्क’ ते ‘कट्टी-बट्टी’पर्यंत निखिल यांनी सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यातील एकही चित्रपट बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळवू शकला नाही. त्यांच्या ‘फ्लॉप’ चित्रपटांत ‘चांदणी चौक टू चायना’, ‘पटियाला हाऊस’शिवाय दाऊदला पाकिस्तानातून आणण्याच्या कथेवर बनविण्यात आलेला ‘डी डे’ यांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या अपयशानंतर सलमान खान याने निखिल यांच्यावर सूरज पंचोली आणि अथिया शेट्टी यांना ‘लाँच’ करणाऱ्या ‘हीरो’ची जबाबदारी सोपविली. यू टीव्हीच्या चित्रपटात इमरान खान-कंगनाची जोडी मिळाली; पण येथेही त्यांना यश मिळाले नाही. काही लोकांचे नशीब बलवत्तर असते. इतक्या अपयशानंतरही त्यांना संधी मिळते;सततच्या अपयशापासून निखिल काय शिकतात ते तेच जाणोत. तशात त्यांना आता दुसरी संधी मिळाल्यास ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती राहील.
निखिल अडवाणीला आणखी किती संधी मिळणार ?
By admin | Updated: September 21, 2015 03:25 IST