नामदेव मोरे, नवी मुंबई समाजप्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. परंतु गत काही वर्षांमध्ये गणेश मंडळांमध्ये रात्रभर जुगाराचा अड्डा सुरू होवू लागला होता. पोलिसांनी प्रथमच मंडळातील जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये यावर्षी जुगारविरहित उत्सव साजरा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. १२२ वर्षांच्या वाटचालीमध्ये हा उत्सव जगभर पोहचला. उत्सवाचे स्वरूप बदलू लागले. प्रत्येक मंडळ लाखो रुपयांचा खर्च करू लागले. समाजप्रबोधनाचे देखावे दाखविले जात असले तरी रात्रभर गणरायासमोरच जुगाराचे अड्डे सुरू झाले. नवी मुंबईमधीलही बहुतांश मंडळांमध्ये रात्री जुगार खेळला जात होता. दिवसा जे मंडपामध्ये फिरकतही नाहीत ते रात्रभर जुगार खेळण्यासाठी मात्र उपस्थित राहू लागले. अनेक जण लाखो रुपये जुगारात गमावू लागले. अनेकांनी महिन्याचा पगार, सणासाठीची रक्कम जुगारात हरल्याची उदाहरणे आहेत. कोपरखैरणेमध्ये एका माथाडी कामगाराने यापूर्वी भाच्याच्या लग्नासाठी दागिने बनविण्यासाठी बहिणीने दिलेले पैसे जुगारात घालविले होते. खुलेआम सुरू असणाऱ्या या जुगाराकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करू लागल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती. गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली होती. नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी गणेशोत्सवामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.यापूर्वी वर्षभर शहरातील बहुतांश सर्व जुगार अड्डे बंद केल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना या अधिकाऱ्यांची भीती वाटू लागली आहे. जुगार अड्डे बंद असल्यामुळे अनेकांनी गणेशोत्सव मंडळांचा आसरा घेण्यास सुरवात केली होती. पोलिसांचा आदेश डावलून काही ठिकाणी जुगार खेळला जात होता. पोलिसांनी विशेष पथक तयार करून धडक कारवाई सुरू केली. दहा दिवसांमध्ये ६ मंडळांवर कारवाई करून तब्बल ७२ जणांवर गुन्हे दाखल केले असून साडेपाच लाख रुपये रोकड व साहित्य जप्त केले आहे. पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९४ मध्ये झाली. यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सवामध्ये जुगार अड्ड्यांवर कारवाई झाली. या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे उत्सवाला लागणारे गालबोट थांबणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ----कारवाईचे स्वागत नवी मुंबई पोलिसांनी शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केले आहेत. एखाद्या ठिकाणी जुगार सुरू असल्याविषयी सामान्य नागरिकाने तक्रार केली तरी तत्काळ कारवाई केली जात आहे. गणेश मंडळांमधीलही जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्यामुळे बहुतांश सर्व मंडळांमधील कार्यकर्त्यांनी कारवाईच्या भीतीने जुगार खेळणे थांबविले. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या या कारवाईचे शहरातील सामान्य नागरिकांनी विशेषत: महिलांनी स्वागत केले असून भविष्यातही जुगारबंदी कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ---जुगाऱ्यांना खास आमंत्रणगणेशोत्सवामध्ये रात्री जागरण करता यावे यासाठी टाईमपास म्हणून पत्ते खेळले असल्याचा दावा काही मंडळे करत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी ठरवून जुगार अड्डे चालविले जातात. त्यासाठी खास जुगार खेळणाऱ्यांना बोलावले जाते. जुगार खेळण्यासाठी पैसे घेतले जातात. लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. -------तुर्भे शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मंडळावर २१ सप्टेंबरला धाड टाकली. १ लाख ९३ हजार ६६० रुपये जप्त करून २७ जणांना अटक करण्यात आली. सेक्टर १६ मधील मिनी मार्केट येथील फे्रंड्स ग्रुप गणेशोत्सव मंडळावरही २१ सप्टेंबरला छापा टाकला. २८,९५० रुपये जप्त करून १७ जणांना अटक केली. २४ सप्टेंबरला पोलिसांनी कलश उद्यानाजवळील जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ७ हजार ५३० रुपये जप्त करून ५ जणांना अटक केली. याच परिसरातील एका घराच्या बाजूला सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १९,६०० रुपये जप्त केले व ८ जणांना अटक केली.
उत्सवात जुगार बंदीचा नवी मुंबई पॅटर्न
By admin | Updated: September 29, 2015 00:52 IST