नेरळ : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळपाडा येथील एका बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे ५३ हजार ५०० रु पयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात मारुती नारायण तांबोळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारु ती तांबोळी यांचे नेरळ पाडा येथे घर असून, ते बुधवार, ११ मे रोजी कामावर जाताना घर बंद करून गेले. ते घरी परत आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या कपाटातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे लॉकेट, चार जोड चांदीच्या बांगड्या, दोन कंबरसाखळी व रोख रक्कम असा सुमारे ५३ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही महिन्यांपासून नेरळ शहर व परिसरात चोरी व घरफोडीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस रात्रीची गस्त घालत असताना चोऱ्या होतातच कशा, असा प्रश्न नेरळच्या जनतेला पडला आहे. शाळा महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेक जण गावी गेले आहेत. त्यामुळे चोरांची या परिसरात आपला मोर्चा वळवला आहे. घरफोडीमुळे नागरिक चिंतेत आहेत. (वार्ताहर)
नेरळ घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Updated: May 15, 2016 04:01 IST