कमलाकर कांबळे, नवी मुंबईशहरात पदोपदी उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नेबरहूड रिलिजन योजना आणली आहे. याअंतर्गत विविध विभागात तब्बल १२९ भूखंड आरक्षित ठेवले आहेत. पनवेल, उरण तालुक्यांसह नवी मुंबई महापालिका हद्दीत जवळपास ४00 बेकायदा धार्मिक स्थळे आहेत. जुन्या आणि प्राचीन धार्मिक स्थळांना अभय देण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असले तरी २00९ नंतर उभारण्यात आलेल्या अनधिकृत प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत सिडकोची आग्रही भूमिका आहे. असे असले तरी नवीन धार्मिक स्थळे उभारली जावू नयेत, यादृष्टीने सुध्दा सिडकोने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पदपथ, सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागा, उद्याने आदी ठिकाणांवर उभारलेल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांवर कठोर निर्बंध आणण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार नेबरहूड रिलिजन ही योजना कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत नवी मुंबईसह, उरण व पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी १२९ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांसाठी आरक्षित केलेल्या या भूखंडांची यादी ना हरकतीसाठी पोलिसांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने धार्मिक स्थळांना भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सिडकोच्या समाजसेवा अधिकारी रिमा दीक्षित यांनी लोकमतला दिली.
धार्मिक स्थळांसाठी ‘नेबरहूड रिलिजन’
By admin | Updated: September 2, 2015 03:54 IST