कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रंगरंगोटी केली असली तरी पुलाच्या डागडुजीकडे, मजबुतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाहनचालकांकडून वर्तवण्यात येत आहे.
पनवेल-सायन महामार्गावर कोपरा-कामोठे-कळंबोली दरम्यान खाडीवर पूल बांधण्यात आला आहे. महामार्गावर बांधण्यात आलेल्या या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. मात्र, त्याच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाच वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने आता वाहने भरधाव वेगाने धावतात.
महामार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या या पुलावरून हलक्याबरोबरच अवजड वाहनांचाही दिवसरात्र ये-जा सुरू असते. महामार्गांचे रुंदीकरण करताना पुलाची दुरुस्ती-डागडुजी करण्यात आली नाही. सध्या संरक्षणकठड्यांची अवस्था बिकट आहे. पूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या काही कठड्यांना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. विशेष करून, मुंबईकडून-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील संरक्षण कठडे जीर्ण झाले आहेत. दुर्दैवाने एखादे वाहन धडकल्यास, कठड्यासह वाहनही खाडीत कोसळून गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
एकंदरच वाहनांना अटकाव करण्याची क्षमता त्या कठड्यांमध्ये दिसत नाही. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यांना सिमेंटचा लेप लावला आणि त्यावर रंगरंगोटी केली. मात्र, पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे येथील रहिवासी अमोल शितोळे यांनी सांगितले. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना पाठपुरावा करणार असल्याचे उपाध्यक्ष गोविंद साबळे म्हणाले. याबाबत माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.