नवी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबईकर थंडीने गारठले असून पारा जवळपास १७ अंशावर गेल्याने गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. बुधवारी कमाल तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस इतका होता तर किमान १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या या थंडीच्या लाटेमुळे कपाटातील उबदार कपडे, कानटोप्या बाहेर पडले असून स्वेटर खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली आहे. शहरातील तापमानात झालेल्या बदलामुळे पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. पहाटेच्या वेळी फिरायला जाणारे नागरिक स्वेटर, शाल, मफलर लपेटून बाहेर पडताना दिसतात. त्याचप्रमाणे झाडांवरही दव पडायला सुरु वात झाली असून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत दाट धुके पहायला मिळते. या गुलाबी थंडीत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी चहाच्या टपऱ्या, गरमागरम भजी खाण्यासाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळते. वातावरणात झालेल्या या बदलामुळे घामाने भिजणारे नवी मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवायला मिळत असून पुढील आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईचा पारा घसरला
By admin | Updated: December 24, 2015 01:50 IST