नवी मुंबई : नवरात्रोत्सवात फुकट्या होर्डिंगबाजीला चाप लागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या काळात विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे. शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करणाऱ्या होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पुढच्या आठवड्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विनापरवाना होर्डिंगबाजीला आळा घालण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. विभाग कार्यालय स्तरावर अनधिकृत होर्डिंगला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूणच नवरात्रोत्सवात स्वागत कमानी, मोठमोठे होर्डिंग्ज तसेच इतर जाहिरातबाजीला थारा न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करून कमानी आणि होर्डिंग्ज उभारणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
नवरात्रीत होर्डिंगबाजीला चाप
By admin | Updated: October 7, 2015 00:21 IST