अजित मांडके ल्ल ठाणेठाणे महापालिकेत महायुती आणि लोकशाही आघाडीच्या समसमान असलेल्या बलाबलात आता पोटनिवडणुकीमुळे बदल झाला आहे. पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेच्या तीन जागा वाढल्या असून काँग्रेसच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या पुन्हा ३४ जागा झाल्या आहेत. एकूणच आता महापालिकेत महायुतीचे पक्षीय बलाबल ६७ झाले असून लोकशाही आघाडीचे संख्याबळ हे ६५ वरून ६२ वर आले आहे. त्यामुळे महापालिकेवर तीन वर्षांनंतर महायुतीच्या एककलमी अमलाचे फाटक पुन्हा एकदा खुले झाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने पुन्हा त्यांनी पोटनिवडणूक लढविली. त्यांच्यासह काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने वागळेतही पोटनिवडणूक लागली होती. उर्वरित चार नगरसेवक हे शरीराने काँग्रेसमध्ये असले तरी ते मनाने शिवसेनेत आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या फाटक दाम्पत्यासह कांचन चिंदरकर या विजयी झाल्याने शिवसेनेचे संख्याबळ तीनने वाढले आहे. सध्या शिवसेनेचे संख्याबळ ५२ असून त्यात आता तीन नगरसेवकांची भर पडल्याने ते आता ५५ झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ हे १८ वरून १५ वर आले आहे. तर राष्ट्रवादीचे संख्याबळ हे ३४ होते. ते आता पुन्हा तेवढेच झाले आहे. दोन नगरसेवकांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने मुंब्य्रात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्या जागा अबाधित ठेवल्या आहेत. पालिकेत २०१२ नंतर डळमळीत होत असलेले महायुतीचे सिंहासन भक्कम झाले आहे. विशेष म्हणजे महायुतीची ताकद आणखी वाढली असून लोकशाही आघाडी आता पिछाडीवर पडली आहे. यापूर्वी पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ हे ५३ होते. परंतु काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने आता ते ५५ झाले असून भाजपा ८, रिपाइं १, बसपा २ आणि एक अपक्ष असे मिळून सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडे आता ६७ चे संख्याबळ झाले आहे. दुसरीकडे लोकशाही आघाडीकडे राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक होते. परंतु, दोघांचे नगरसेवक बाद झाल्याने त्यांची संख्या ३२ झाली होती. परंतु, आता पुन्हा ३४ झाली असून काँग्रेसची संख्या मात्र १८ वरून १५ वर आली आहे. त्यांच्या गोटात मनसेचे सात, अपक्ष सहा असे मिळून ६५ चे संख्याबळ होते. परंतु, आता तीन नगरसेवकांचे संख्याबळ घटल्याने लोकशाही आघाडीचे संख्याबळ आता ६२ वर आले आहे. स्थायी समितीत वर्णी? : रवींद्र फाटक हे निवडून आल्याने आता त्यांना महापालिकेत कोणते पद मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागेल, अशी शक्यता आधी वर्तविली जात होती. परंतु, भाजपाच्या आशा शेरबहादूर सिंह यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने स्थायी समिती आता भाजपाच्या वाटेल जाईल, हे निश्चित झाले आहे. परंतु, आता फाटकांना पालिकेत कोणते पद मिळते, याबाबतची उत्सुकता मात्र पालिकेत वाढली आहे.
महापालिकेत युतीचा एकछत्री कारभार?
By admin | Updated: January 20, 2015 00:10 IST