अलिबाग : ट्रेलर चोरीला गेल्याचा बनाव करून, त्यासंदर्भात खोटी फिर्याद रोहा पोलीस ठाण्यात दाखल करून पोलिसांचीही फसवणूक करून, विम्याची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न करणारा ट्रेलर मालक स्वत: ट्रेलर चोर असल्याचे उघडकीस आले आहे. अवघ्या १७ दिवसांत या घटनेचा छडा लावण्यास रोहा पोलिसांना यश आले आहे.१३ सप्टेंबरला गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड नाका येथून २५ लाख रु पयांचा एमएच ४६/एएफ ६८९९ हा ट्रेलर चोरीस गेलेल्याची तक्रार कळंबोली येथील रहिवासी असणाऱ्या फिर्यादींनी रोहा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. फिर्याद दाखल करणाऱ्या ट्रेलरच्या मालकानेच हा ट्रेलर कोलाड नाका येथून कळंबोली येथे नेवून एका ठिकाणी पार्क करून ठेवला होता. या ट्रेलरच्या चोरीमुळे त्याच्या विम्याचे (इन्शुरन्सचे) त्याला पैसे मिळून फायदा होणार होता. याकरिता त्याने चोरीचा बनाव केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले. या ट्रेलर मालकाला रोहा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर करून, पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या घटनेचा तपास निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस नाईक पी.आर.पडते, पोलीस शिपाई आर.एस.सुर्वे यांनी केला आहे. (विशेष प्रतिनिधी)
विमा कंपनीस फसवून लाटले पैसे
By admin | Updated: October 1, 2015 23:46 IST