लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : मिनीट्रेन बंद होऊन वर्षपूर्ती होण्यास आलेली असताना या रेल्वे मार्गाची कामे अत्यंत संथ गतीने होत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारास स्थानिक जनता वैतागलेली असून पर्यटकांमध्येसुद्धा तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. मागील वर्षभरात येथील स्थानिक राजकीय मंडळींनी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा पदरी निराशा आल्याने अखेरीस येथील विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यात फलकाद्वारे पर्यटकांना आवाहन करून आपणच यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच रेल्वेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना टिष्ट्वटर, फेसबुक, मेल तसेच सोशल मीडियाद्वारे कळवून मिनीट्रेन सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा आशयाचा जाहीर फलक लावून आवाहन केले होते. त्यानुसार येथे फिरावयास आलेले कोपरी (ठाणे) येथील पर्यटक बी. आर. मेश्राम यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २० एप्रिल रोजी पत्रव्यवहार करून ही समस्या मार्गी लावण्याबाबत कळविले होते. अशाच प्रकारे अनेक पर्यटकांनी आपापल्या परीने संबंधित मंत्री, रेल्वे अधिकारी यांना टिष्ट्वटर, फेसबुक, मेल, सोशल मीडियाच्या माध्यमांतून कळवले आहे. त्यामुळे शासन काय ठोस उपाययोजना करणार याकडे स्थानिकांसह पर्यटकांचे लक्ष लागून राहिले आहे. ऐन पर्यटन हंगामात मिनीट्रेन बंद असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे.
मिनीट्रेन रेल्वेमार्गाचे काम अपूर्ण
By admin | Updated: May 7, 2017 06:21 IST