- नामदेव मोरेनवी मुंबई - मलावी हापूस व टॉमी अटकीन नंतर पहिल्यांदाच मलावी येथील केंट आंबा भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एक टन आवक झाली असून प्रतिकिलो ६२५ ते ६७५ रुपये दराने विक्री होत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे आंबे उपलब्ध होणार आहेत.
दक्षीण पूर्व आफ्रिकेतील हापूस सदृष्य व टाॅमी अटकीन हे आंबे मागील काही वर्षापासून नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात. यावर्षी २८ नोव्हेंबरला या आंब्याची आयात झाली होती. दोन्ही आंब्यांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मलावी येथील केंट आंबेही मंगळवारी बाजारसमितीमध्ये दाखल झाले आहेत. केंट आंब्याच्या २७० पेट्या दाखल झाल्या आहेत. एक पेटीमध्ये ४ किलो आंबे आहेत. प्रतीबॉक्स २५०० ते २७०० रुपये दराने विकले जात आहेत. प्रतीकिलो आंब्याचा दर ६२५ ते ६७५ रुपये असा आहे. हे आंबे मुंबईसह पुणे, बंगलोर, राजकोट, अहमदाबाद व दिल्ली येथे पाठविण्यात आले आहेत. केंट आंब्याचा हंगाम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. पुढील १५ ते २० दिवस आंब्याची आयात सुरू राहणार आहे.
यावर्षी कोकणच्या हापूसची आवक मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर अखेरीस मलावी येथून टॉमी अटकीनची आयात झाली होती. आता केंट आंब्याची आवक सुरू झाली असून त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.- संजय पानसरे, संचालक फळ मार्केट